घराला बाहेरच्या खोलीत दक्षिणेकडे उघडणारी संपूर्ण भिंतीच्या लांबीची 3 फूट रुंदीची आणि 7 एक फूट लांबीची गज नसलेली व पूर्ण काच सरकावता येणारी खिडकी आहे . त्यातून कोल्हापूरच्या दक्षिणेकडे असलेले खिडकीपासुन ते क्षितिजा पर्यंतचे (त्यावेळचे करडे)आकाश, त्या खालचे निळसर धुरकट डोंगर आणि हिरवट टेकडयांचे उतार दिसत राहतात . पावसाळ्यात त्यावर ढग उतरून झिरझिरणारा फिका निळसर पांढुरका पाऊसही दिसतो . पावसाळ्यातील पाऊस नसलेल्या किंवा भुरभुरणा-या सायंकाळी या साऱ्यावर एक निल सावळी करुण बावरी छाया व्यापून राहते .

अशाच एका सायंकाळी सुरु असलेल्या मंद झिरझिरीत पावसात ही खिडकीतून बाहेर पहात उभी होती आणि मी बसून खिडकीतून बाहेर पहात होतो . नजरेस दिसणारे दृश्य आम्हा दोघांना सारखेच दिसत होते. तिची आणि माझी आत्ममग्नता विलक्षण होती. आम्ही दोघे जवळच होतो आणि हजारो जन्म… दूर !


या आत्ममग्न भिजल्या
कातरवेळेत
अधोवदन ही संध्या,
संथ झिरझिरीत.
ढग सावळ अंधुकसे
नभात स्तब्ध
निर्विकार मातीतल्या,
कोरल्या खडकागत.
नि :स्तब्ध सांजावतानाची
अलैकिक शांतता, आणि
आपण दोघेही आत्ममग्न.
पाहतोय बाहेर,
चौकटीतल्या खिडकीच्या..
तू तुझे क्षितिज
मी माझे क्षितीज !

Leave a comment

Trending